
झुंजार । प्रतिनिधी एरंडोल- आयशर गाडीस काळ्या रंगाची ताडपत्री बांधून त्यामध्ये क्रूरतेने बांधलेल्या गायी व वासरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली.पोलिसांनी वाहनातील अकरा गायी,दोन वासरे,आयशर गाडी असा सुमारे पंधरा लाखाचा ऐवज जप्त केला.कतलीसाठी गायी नेणारा ट्रक सापडल्याचे समजताच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
वाहनातील गायी आणि वासरांना मराठखेडे (ता.पारोळा) येथील समर्पण गो शाळेत रवाना करण्यात आले.याबाबत माहिती अशी,की काल (ता.३०) दुपारीतीन वाजेच्या सुमारास काही नागरिकांना आयशर गाडीतून गायी व वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली.धरणगांव चौफुली जवळ भरधाव वेगाने आयशर क्रमांक एम.एच.२० ई एल ७००३ जात असल्याचे दिसताच नागरिकांनी सदर वाहनास थांबवले.
बजरंगदलाचे कार्यकर्ते सागर भास्कर महाजन हे धरणगाव चौफुली येथून जात असतांना त्याना वाहनाजवळ गर्दी दिसली.त्यांनी त्यांचे सहकारी शंतनू भेलसेकर,कृणाल अतुल ठाकूर,विवेक शाम ठाकूर,करण हिम्मत पाटील याना घटनेची माहिती देऊन बोलावून घेतले.वाहनास काळ्या रंगाची ताडपत्री लावलेली असल्यामुळे त्यांनी वाहन चालकाकडे वाहनात काय आहे याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने कार्यकर्त्यांना संशय आला.
कार्यकर्त्यांनी ताडपत्री फाडून वाहनाच्या मागच्या बाजूने पाहिले असता त्यामध्ये गुरे क्रूरपणे बांधल्याचे आढळून आले.वाहनात अकरा गायी आणि तिन वासरे दोराने बांधून अत्यंत दाटीवाटीने बांधण्यात आले होते.वाहन चालकाकडे गुरे वाहतुकीचा परवा मागितला असता त्याचेकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही.
याबाबत सागर भास्कर महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक गणेश नानासाहेब कु-हाडे रा.रांजणगाव,ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद आणि योगेश खंडागळे रा.तान्दलवाडी ता.गंगापूर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार संतोष चौधरी तपास करीत आहेत.वाहनातील अकरा गायी आणि तीन वासरांना समर्पण गो शाळेत रवाना करण्यात आले.यातील दोन गायींना गंभीर दुखापत झाली होती.







