उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य ; ‘गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा’

Spread the love

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंड केल्याने शिवसेनेत(shivsena) मोठी फूट पडली आहे. आता राज्यातील महापालिका, नगरपालिकांमध्येही ही फूट पडताना दिसत आहे. दुसरीकडे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. पण उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाबाबतही सावध केले आहे.

मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने पक्षातील ४० आमदारांना पळवत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना झालेली मदत पाहता शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

pic Google

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने त्यांच्या गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी नव्या विधानसभाध्यक्षांची नेमणूक करीत शिवसेनेला जोरदार शह दिला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिंदे गट आणि भाजप हे दोघे मिळून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना न्यायालयाच्या पातळीवरही आधार मिळत आहे. शिवसेनेतून फुटलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट येत्या काही दिवसांत प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. त्यात त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करीत आहे.

Pic Google

मुंबई तसेच दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ यांच्याशी सातत्याने संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढत आहे. मात्र दुर्दैवाने यात अपयश आले तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर ते सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते. ‘माझी प्रकृती ठिकठाक असल्याने आता दर दिवसाआड आपण शिवसेना भवनमध्ये उपलब्ध आहोत’, असे सांगत विरोधकांशी दोन हात करण्यास आपण सज्ज असल्याचे संकेतच त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले : –

“कायद्याने जो लढा द्यायचा आहे तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तर गाफील राहू नका. शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघऱी पोहोचवा,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना विधिमंडळ पक्ष गटनेते म्हणून शिंदे यांना मान्यता

विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत असा निर्वाळा देत शिवसेनेला झटका दिला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्याऐवजी शिवसेना आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर त्यावेळी महाराष्ट्राबाहेर असलेल्या एकनाथ शिंदे गटाने शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले होते.

सर्वसामान्यांशी संपर्क

अपात्र आमदारांसंदर्भात ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे समाजमाध्यमांवर सर्वसामान्यांशी संपर्क साधणार आहेत. देशात लोकशाही आहे की नाही याचा निकाल या सुनावणीच्या माध्यमातून लागणार असल्याकडे ते सर्वसामान्यांचे लक्ष वेधणार असल्याचे समजते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार