बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.

Spread the love

संगमनेर : – मेंढ्यांचा फडशा पाडण्यासाठी आलेल्या बिबट्याला हाकलण्यासाठी गेलेल्या मेंढपाळावरच हल्ला झाल्यावर पतीला वाचविण्यासाठी पत्नीने प्रचंड धाडस दाखवत बिबट्याशी एक तास थरारक झुंज देत त्याला पळवून लावले.ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरीच्या कारवस्ती येथे बुधवारी मध्यरात्री घडली. जखमी मेंढपाळ चंदू पुंजा दुधवडे यांच्यावर सध्या संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत. पतीचे प्राण वाचविण्यासाठी नंदा यांनी दिलेल्या झुंजीचे कौतुक होत आहे.

चंदू व त्यांची पत्नी नंदा कारवस्ती परिसरात मेंढ्या चारत होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघुरात बंद केल्या व ते झोपले. पहाटे एक ते दोन वाजेच्या सुमारास आलेल्या बिबट्याने एका मेंढीवर हल्ला केल्याने बाकीच्या मेंढ्या ओरडल्या. त्यामुळे जागे झालेल्या दुधवडे दाम्पत्याने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्याने चंदू यांच्यावर झेप घेत त्यांना खाली पाडले व डाव्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे चंदू मोठ्याने ओरडले. हे पाहताच नंदा यांनी क्षणाचाही विलंब न लावता पतीच्या छातीवर बसलेल्या बिबट्याच्या शेपटीला दोन्ही हाताने धरून ओढले. बिबट्या चंदू यांचा गळा धरण्याचा प्रयत्न करत असताना नंदा यांनी जीवाची पर्वा न करता थेट बिबट्यावर झेप घेतली आणि हातातील काठीने त्याच्या तोंडावर मारा केला. ही झुंज सुमारे एक तास चालू होती, असे नंदा यांनी सांगितले. यानंतर बिबट्या पळून गेला.

दरम्यान, हा आरडाओरडा ऐकून मधुकर राहाणे, बाबासाहेब राहाणे, शंकर राहाणे, बबन राहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती समजताच सरपंच भाऊराव राहणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी चंदू यांना तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक औषधोपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. चंदू यांच्या दोन्ही हातांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत.वनरक्षक विक्रांत बुरांडे म्हणाले, ‘ बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समजताच पहाटे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नामदेव ताजणे यांच्यासह आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो होतो. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही त्या परिसरात दोन पिंजरे लावले आहे. यासाठी आम्हाला नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. सकाळीही घटनास्थळी जाऊन बिबट्याने फडशा पाडलेल्या मेंढीचा पंचनामा केला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी