एरंडोलचे पर्जन्यमापक-दैनावस्था-प्रशासनाची उदासिनता ! तालूक्यात सरासरी पर्जन्यमान किती माहितीच मिळेनाआश्चर्य-

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
हवामान खात्याने दोन महिन्यापूर्वीच अंदाज व्यक्त करून यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र जून कोरडा गेला, शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या, काही ठिकाणी महापुरामुळे नुकसान तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट. त्यामुळे शेतकरी राजाचा यंदा खरीप हंगाम हातचा जाणार असे वाटू लागले आहे.

प्रत्येक तालूक्यात आत्तापर्यंत किती पाऊस झाला, आज किती पाऊस झाला याची माहिती प्रशासनाकडून मिळणे आवश्यक असते. एरंडोल तालूक्यात चार ठिकाणांकडून दररोजचे पर्जन्यमान पर्जन्यमापक यंत्रामार्फत गोळा करून सरासरी पर्जन्यमान जाहीर केले जाते. एरंडोल तालूक्यात एरंडोल, कासोदा, रिंगणगांव, उत्राण या चार ठिकाणांचे (मंडळांचे) पर्जन्यमान दररोज तहसिल कार्यालयात पाठवून त्यांचेमार्फत वृत्तपत्रांसाठी माहिती दिली जाते. मागील वर्षी नायब तहसिलदार एस पी शिरसाठ यांनी जूनपासून पर्जन्यमानाची माहिती नियमित पाठविली.

त्यानुसार शेतकरीसह नागरीकांना देखील पर्जन्यमानाबाबत माहिती मिळाली. परंतू सध्या त्यांची बदली झाल्याचे तहसिल कार्यालयामार्फत माहिती मिळाली. यंदा मात्र तहसिल कार्यालयामार्फत पर्जन्यमानाची माहितीच मिळाली नाही, वृत्तपत्रांसाठीही नाही. याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एरंडोल शेतकी संघासमोरील तहसिलच्या भिंतींवर पर्जन्यमापक यंत्राची दैनावस्था झाली आहे. काटेरी झुडूपे, मोडकळीस आलेल्या भिंती यामुळे त्याठिकाणी जाणे अवघडच यास म्हणावे तरी काय ? अधिक चौकशी केली असता सध्या पाटबंधारे विभागाकडे असलेल्या पर्जन्यमापकाकडून माहिती घेत असल्याचे समजले.

शेतकरी वर्गासाठी पर्जन्यमानाची आकडेवारी माहिती आवश्यक असल्याने कर्तव्यदक्ष तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी दखल घेणे गरजेचे आहे. एरंडोलच्या पर्जन्यमापक यंत्राची दशा, दुर्दशा पाहून रिंगणगांव, कासोदा, उत्राणच्या यंत्रांची अवस्था कशी असेल ? याचीही चर्चा जनमानसात सुरू आहे.
फोटो ओळ :- तहसिलच्या भिंतींवर काटेरी झुडूपामध्ये असलेले पर्जन्यमापक यंत्र

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार