भारताने सलग दुसऱ्या टी-२०सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केला पराभव; यशस्वी-इशान चमकला,सुर्यकुमारच्या युवा संघाने केला चमत्कार.

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने ४४ धावांनी जिंकला. या मालिकेतील पहिला सामना भारताने दोन गडी राखून जिंकला होता. या विजयासह भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता भारताला उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकून मालिकेत विजय मिळवता येईल. तिरुअनंतपुरममध्ये युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १९१ धावा करू शकला आणि सामना गमावला. भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने ५३, ऋतुराज गायकवाडने ५८ आणि इशान किशनने ५२ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या ३० धावांपर्यंत पोहोचली. मात्र, शॉर्ट १९ धावा करून बाद झाला आणि कांगारूंचा संघ रुळावरून घसरला. इंग्लिश दोन धावा करून बाद झाला आणि मॅक्सवेल १२ धावा करून बाद झाला. स्मिथही १९ धावा करून बाद झाला. स्टॉइनिस आणि डेव्हिडने अर्धशतकी भागीदारी करून संघाला सामन्यात परत आणले, पण डेव्हिड बाद झाल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. डेव्हिडने ३७ आणि स्टॉइनिसने ४५ धावा केल्या. शेवटी मॅथ्यू वेडने नाबाद ४२ धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियन संघ नऊ गडी गमावून १९१ धावाच करू शकला. भारताकडून प्रसीध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी शेवटच्या सात षटकात १११ धावा केल्या आणि ४ विकेट गमावत २३५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (५३, २५ चेंडू), ऋतुराज गायकवाड (५८, ४३ चेंडू) आणि इशान किशन (५२, ३२ चेंडू) यांच्या अर्धशतकांनी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंगने नऊ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढली.

मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले, मात्र ऋतुराज गायकवाडसह सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने आपल्या झंझावाती खेळीने त्याचा निर्णय उलटवून टाकला. शॉन अॅबॉटच्या चौथ्या षटकात त्याने पहिल्या तीन चेंडूंवर चौकार आणि पुढच्या दोन चेंडूंवर षटकार मारत २४ धावा केल्या. भारताने केवळ ३.५ षटकात ५० धावा पार केल्या. एलिसने टाकलेल्या सहाव्या षटकात यशस्वीने सलग तीन चौकार मारत २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-२० मधील दुसरे अर्धशतक होते, परंतु एलिसच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो शॉर्ट थर्ड मॅनवर झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. पॉवरप्लेच्या सहा षटकांत भारताने एका विकेटच्या मोबदल्यांत ७७ धावा केल्या.

यशस्वी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी धावांवर मर्यादा आणल्या. भारताने ९.५ षटकात १०० धावा पूर्ण केल्या. पॉवरप्लेनंतर भारताने पुढच्या सहा षटकांत ३९ धावा केल्या, पण गायकवाड आणि इशान किशन खेळपट्टीवर तग धरून राहिले. या काळात ईशानने स्टॉइनिसला षटकारही लगावला. दोघांनीही ४६ चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही भागीदारी पूर्ण होताच इशानने ९५ मीटर दूर षटकार आणि नंतर मॅक्सवेलवर चौकार मारला. या षटकात गायकवाडने पहिला षटकार मारला. या षटकात २३ धावा आल्या. इशानने सांघाला षटकार मारून २९ चेंडूत आपले सहावे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. ‍१५ षटकात भारताची धावसंख्या १ विकेटवर १६४ धावा होती. १४व्या आणि १५व्या षटकात एकूण ४० धावा झाल्या.

स्टॉइनिसच्या वाईड बॉलवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात इशान झेलबाद झाला. त्याने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्याने गायकवाडसोबत ८७ धावांची भागीदारी केली. कर्णधार सूर्यकुमार येताच त्याने स्टॉइनिस आणि नंतर झम्पाला षटकार ठोकला. यानंतर सलामीवीर गायकवाडने ३९ चेंडूत तिसरे टी-२० अर्धशतक पूर्ण केले. स्टॉइनिसने सूर्यकुमारचा (१९) नेत्रदीपक झेल घेत त्याचा डाव संपवला. रिंकू सिंगने १९ व्या षटकात अॅबॉटवर दोन षटकार आणि तीन चौकार मारून भारताला २०० च्या पुढे नेले. या षटकात २५ धावा आल्या.

यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला तिसरा सामना २८ नोव्हेंबर रोजी बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारत सलग तिसर्‍या विजयासह मालिकेवर कब्जा करणार की कांगारू पलटवार करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार