साक्री दरोड्याची धक्कादायक माहिती! प्रियकरा सोबतच बनावट दरोड्याचा आणि अपहरणाचा रचला कट; पोलिसांनी केला घटनेचा उलगडा.

Spread the love

साक्री :- येथील सरस्वतीनगरमधील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाच्या अनाकलनीय घटनेचा अखेर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह यंत्रणेने उलगडा करण्यात यश मिळविले. त्यात मैत्रिपूर्ण संबंधातून तरुणीसह तिच्या मित्राने दरोडा आणि अपहरणाचा बेबनाव केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. या विचित्र घटनेमुळे स्थानिक पोलिस यंत्रणा तर वेठीस धरलीच गेली, शिवाय साक्रीसह जिल्ह्याच्या प्रतिमेस काहीअंशी तडा गेल्याचे बोलले जात आहे. चार ते पाच दरोडेखोरांकडून अपहरण झालेल्या २३ वर्षीय तरुणीने मैत्रिपूर्ण संबंधातून मित्राच्या मदतीने स्वतःच्या अपहरणासह दरोड्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे येत आहे. या अनुषंगाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रेस नोटमधून अनेक धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. या प्रेस नोटविषयी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत कुठलाही वस्तुनिष्ठ लेखी स्वरूपात खुलासा झालेला नव्हता किंवा प्रेस नोट नाकारण्यातही आलेली नव्हती.

दोन संशयित कोठडीत…
दरम्यान, या प्रकरणी इंदूरजवळून ताब्यात घेतलेला संशयित विनोद भरत नाशिककर (वय ३८, रा. गायत्रीनगर, शाजापूर, मध्य प्रदेश) व वाहनचालक रोहित संजय गवळी (२२, रा. मोगलाई, धुळे) याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाय या बेबनाव केलेल्या घटनेत साथ देणाऱ्या हरियाना येथील संशयित चार मजुरांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
दोघांची ओळख झाली..
सरस्वतीनगरात २५ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास दरोडा पडला. त्यातील चार ते पाच दरोडेखोरांनी घरातील ८८ हजार ५०० रुपयांचे दागदागिने नेताना तरुणीचे अपहरण केले. दरोडेखोरांनी काळ्या रंगाचे ड्रेस व बूट, कानटोपी परिधान करत चेहरे झाकले होते. या प्रकरणी ज्योत्स्ना पाटील यांनी फिर्याद देत भाचीचे अपहरण केल्याचे नमूद केले. या घटनेचा पोलिस तपास होताना संशयित विवाहित विनोद नाशिककर हा संबंधित तरुणीच्या साक्री येथील आदर्शनगरातील घराशेजारी मे २०२२ ते २०२३ या कालावधीमध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. तो रायपूरबारी (ता. साक्री) येथील सौरऊर्जा प्रकल्पस्थळी ठेकेदार होता. या कालावधीत विनोद व संबंधित तरुणीची ओळख झाली.

दोघांचे कटकारस्थान

काही कालावधीनंतर विनोद साक्रीहून मध्य प्रदेशातील शाजापूर येथे परिवारासह वास्तव्यास गेला. विनोद व त्या तरुणीचा मोबाईल, इन्स्टाग्रामद्वारे संपर्क होत होता. या माध्यमातून तरुणीसह विनोदने घरातून पळून जाण्यासाठी दरोड्याचा कट रचला; परंतु आई-वडिलांचे आदर्शनगरमधील घर पळून जाण्यास सोयीस्कर नसल्याने संबंधित तरुणी २२ नोव्हेंबरपासून तिची आत्या ज्योत्स्ना पाटील (रा. सरस्वतीनगर, साक्री) यांच्याकडे तात्पुरती राहण्यासाठी गेली. हे ठिकाण दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे पळून जाण्यासाठी सोयीचे होते. विनोद व त्या तरुणीने दरोड्याचा कट रचला, त्यासाठी आवश्यक इतर लोकांच्या मदतीची गरज म्हणून विनोदने त्याच्यासोबत काम करणारे हरियानातील अमनसिंग व चरणसिंग यांच्यासोबत कटकारस्थानाबाबत चर्चा केली. त्यांनी हरियानातून आणखी दोन जणांना बोलावून घेतले.

अन्‌ दरोडा टाकला…
प्रथम विनोद व इतर चार व्यक्ती, असे एकूण पाच जण सेंधवा (मध्य प्रदेश) शहराजवळील धामनोर या गावी २५ नोव्हेंबरला दुपारी अडीचपासून एकत्र आले. त्या ठिकाणाहून पाचही जण विनोदने सोबत आणलेल्या बोलेरो या वाहनातून साक्री येथे त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोचले. दरम्यानच्या काळात ती तरुणी आत्याच्या घरातून इन्स्टाग्रामद्वारे विनोदच्या संपर्कात होती. सायंकाळी साडेसातची वेळ ही दरोडा टाकण्यासाठी योग्य नाही व लोकांना संशय येईल म्हणून तिने विनोदला रात्री साडेदहाची वेळ दिली. त्यानुसार विनोद व त्याचे साथीदार सरस्वतीनगरात घटनेच्या ठिकाणी बोलेरोतून पोचले. विनोदने तरुणीच्या संमतीने ठरल्याप्रमाणे सोबतच्या व्यक्तींसह दरोडा टाकला.

मोबाईल नदीत फेकले…
घराच्या मागील बाजूकडील संरक्षण भिंतीवरून उड्या मारून कंपाउंडच्या आत ते दरोडेखोड गेले व समोरील घराच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन विनोदने बेल वाजविली. तरुणीच्या आत्याने दरवाजा उघडताच जबरीने घरात प्रवेश केला व विनोद वगळता तिघांनी ज्योत्स्ना पाटील यांचे तोंड दाबून त्यांना बेडरूममध्ये ओढत नेले. त्यांचे हातपाय बांधून तोंडात कापडी बोळा टाकला. त्यांची आरडाओरड इतरांनी ऐकू नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढविला. तिन्ही व्यक्तींनी घरातील कपाटातील कपडे व अन्य साहित्य अस्ताव्यस्त फेकले व दरोड्याचे दृश्य तयार केले. फिर्यादी ज्योत्स्ना यांच्या कानातील सोन्याचे दागिने, मोबाईल जबरीने काढून नेले. वाहनात बसल्यानंतर तरुणीने तिचा व आत्याचा मोबाईल बंद केला व नंतर मार्गावरील एका नदीत दोन्ही मोबाईल फेकून दिले. विनोदने सोबत आणलेली छऱ्याची बंदूक देवास शहराजवळील क्षिप्रा नदीत फेकून दिली.

विनोद साक्रीच्या संपर्कात…
विनोद व तरुणी बोलेरो (एमपी १३, झेडबी ४२७०)ने साक्री, रायपूरबारी, लामकानी, शिरपूर, इंदूरमार्गे सर्व टोलनाके वगळून शाजापूरपर्यंत पोचले. या काळात विनोद व तरुणीच्या वडिलांचे पूर्वीचे संबंध असल्याने त्यांच्याकडून विनोद हा मोबाईलद्वारे दरोड्यानंतरच्या घडामोडींची माहिती घेत होता विनोदवर काही शंका नसल्याने घडलेली सर्व माहिती सहज तरुणीचे वडील देत होते. पोलिस अधीक्षकांनी साक्रीत घटनास्थळी भेट दिल्याची माहिती मिळाल्यानंतर मात्र विनोद व तरुणीने घटनेचे गांभीर्य ओळखून एकमेकांपासून वेगळे होऊन तरुणीने पुन्हा घरी जाण्याचे त्यांच्यात ठरले.

मोबाईल फॉरमॅट करून टाक..!
विनोद व तरुणी शाजापूर येथून इंदूरला बोलेरोने आले. विनोदने तरुणीला पंधराशे रुपये दिले व रिक्षातून इंदूर ट्रॅव्हल पॉइंटवर पाठविले. तिथे पोचल्यावर तरुणीने रात्री आठच्या सुमारास ट्रॅव्हलमध्ये प्रवास करताना एका प्रवाशाच्या मोबाईलवरून विनोदच्या मोबाईलवर कॉल केला व सेंधव्याला जाणाऱ्या ट्रॅव्हलमध्ये बसल्याचे सांगितले. रात्री दहाला सेंधवा येथे पोचल्यानंतर तेथे तरुणी आल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली. तरुणीस पोलिसांनी २७ नोव्हेंबरला साक्रीत सुखरूप आणले व आई-वडिलांच्या ताब्यात दिले. तसेच २७ ला रात्री आठच्या सुमारास तरुणीने तिच्या आईच्या मोबाईलवरून विनोद यास संपर्क साधून साक्री येथे सुखरूप घरी पोचल्याचा निरोप दिला.तसेच ‘तुझ्यावर (विनोद) संशय येत असल्याने तू मोबाईल फॉरमॅट करून टाक,’ असेही त्यास तरुणीने कळविले. त्याप्रमाणे विनोदने त्याचा मोबाईल फॉरमॅट केला. हा सगळा धक्कादायक, चक्रावणारा घटनाक्रम असून, दरम्यान पोलिसांचा तपास सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार