पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे बिल काढून देतो म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक 12 हजार ₹ लाच स्वीकारताना ACB जाळ्यात

Spread the love

जळगाव जामोद :- पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून जळगाव जामोद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक यांना 12 हजार रुपये लाच घेताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही कारवाई नगरपरिषदेच्या कार्यालयात बुधवारी (दि.13) करण्यात आली. मुख्याधिकारी आकाश अविनाश डोईफोडे वय 32 रा. मोहरी ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विद्युत पर्यवेक्षक दिपक कैलास शेळके वय-30 रा. उबाळखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत जळगाव जामोद येथील 41 वर्षीय व्यक्तीने बुलढाणा एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. एसीबीच्या पथकाने 8 नोव्हेंबर, 11 व 12 डिसेंबर रोजी लाच पडताळणी करुन बुधवारी (दि.13) सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले.तक्रारदार यांच्या कंपनीने नगरपरिषद जळगाव जामोद अंतर्गत पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे. तक्रारदार यांच्या कंपनीने केलेल्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर चे बिल तसेच तक्रारदार यांनी स्वतः केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके यांनी लाचेची मागणी केली.

शेळके यांनी स्वतः साठी सहा हजार रुपये व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांच्यासाठी सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक लाच मागत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात केली.प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता डोईफोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन रक्कम स्वीकारण्याससंमती दिली. तसेच लाचेची रक्कम शेळके यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यावरून सापळा कारवाई आयोजित केली.विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधिक्षक शितल घोगरे करीत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधिक्षक शितल घोगरे, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे ,पोलीस निरीक्षक महेश भोसले , पोलीस अंमलदार शाम भांगे, विलास साखरे, प्रवीण बैरागी,रवी दळवी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी आणि चालक नितीन शेटे, अरशद शेखयांच्या पथकाने केली.

हे पण वाचा

टीम झुंजार