खूनाच्या आरोप, 2वर्षे तुरुंगात,जामिनावर सुटका , कायद्याचे घेतले ज्ञान वकील होऊन,स्वत: निर्दोष सिद्ध करत डाग पुसला.

Spread the love

किरठल (उत्तर प्रदेश):- पोलिसाच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एका तरुणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष बाब ही आहे की या तरुणाने जामिनावर सुटल्यानंतर वकिलीचे प्रशिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाच्या जोरावर त्याने स्वत:ला निर्दोष सिद्ध केले. उत्तर प्रदेशातील किरठलमधील ही घटना असून अमित चौधरी असं या तरुणाचं नाव आहे. 12 वर्षांपूर्वी त्याला पोलिसाच्या खुनाच्या आरोपात तुरुंगात जावं लागलं होतं. अमित जेव्हा तुरुंगात गेला होता तेव्हा तो 18 वर्षांचा होता.

उत्तर प्रदेशातील किरठलमध्ये झालेल्या पोलिसाच्या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. अमितला या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा आपण निर्दोष आहोत हे अमितला सिद्ध करणं भाग होतं. गुन्हा न करता आपण हा त्रास भोगत असल्याबद्दल अमितला स्वत:रच राग येत होता. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने वकील बनण्याचा निर्णय घेतला होता. अटकेच्या 2 वर्षानंतर अमित जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. यावेळी त्याने कायद्याचे शिक्षण घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले.

अमितने BA LLB, LL.M असे शिक्षण घेत कायद्याचे ज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याने या ज्ञानाचा वापर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी केला. त्याने आपली बाजू स्वत:च कोर्टासमोर मांडली. त्याने सादर केलेले युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत त्याची निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर अमितने त्याच्यासारखा त्रास सहन करावा लागलेल्या इतर कैद्यांना, आरोपींना मदत करण्याचं ठरवलं आहे. गरजूंना आपण मोफत मदत करायलाही तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार