गावाजवळ उभ्या असलेल्या मालट्रकवर भरघाव वेगात दुचाकी आदळल्याने पती पत्नीने घेतला जगाचा निरोप

Spread the love

वाई : पाचवड (ता.वाई) गावच्या हद्दीत उभ्या मालट्रकवर वाई बाजूकडुन भरघाव वेगात दुचाकी आदळल्याने उंब्रज येथील पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उंब्रज येथील लक्ष्मीनगर गोसावीवस्ती मध्ये शोककळा पसरली. या अपघाताची माहीती भुईंज पोलिसांना समजल्यावर सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे, हवालदार आप्पा कोलवटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व मृतदेह ताब्यात घेऊन, पंचनामा करुन ते शवविच्छेदनासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.

हा अपघात पाचवड ता.वाई गावच्या हद्दीत दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला. वाई पाचवड रोडवर एक मालट्रक ऊभा होता. वाई बाजूकडून भरघाव वेगात सातारा बाजूकडे जाणारी दुचाकी (क्र.एम.एच.११ सी.क्यू ६१२९) हिने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या रेखा सोमनाथ चव्हाण (वय ४०) या गाडीवरुन फेकल्या गेल्या. त्या रस्त्यावर आदळल्याने डोक्याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर दुचाकीवरील चालक पती सोमनाथ चव्हाण (वय ४५) हे मालट्रकवर आदळल्याने जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून त्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आप्पा कोलवटकर हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार