गर्भनिदान करणारे रॅकेट उद्ध्वस्त, 19 वर्षीय इंजिनिअर तरुणी करीत होती गर्भनिदान,तुरुंगात असलेल्या मावस भावाकडून घेतल प्रशिक्षण.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :-संपूर्ण राज्यासह देशभरात मातृदिन उत्साहात साजरा करत आहोत. यातच आज मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली असून गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे.राहत्या घरी इंजिनिअरींग करणारी मुलगी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील तिरुपती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले. पुरोगामी राज्य अशी ओळख असणाऱ्या राज्यात ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी आहे.

12 लाख 78 हजारांची आढळली कॅश

यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजारांची कॅश देखील मिळून आली. यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य,लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. पुण्याहून महिला आली गर्भलिंगनिदान चाचणीसाठी इंजिनिअर तरुणी गर्भवती महिलांचं गर्भलिंगनिदान टॅबमधील एपवर करायची. तिच्या लॅपटॉपवर गर्भात मुलगा आहे की मुलगी हे दाखवत असल्याचं आढळून आलं. टॅबमध्ये अनेक फोटोही सापडले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व साहित्य जप्त केलं आहे. पुण्यातील एक महिला या ठिकाणी गर्भलिंगनिदान करण्यासाठी आली होती. त्या महिलेला दोन मुली असून ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे. तिच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी ती नातेवाईकांसोबत आली होती. तिच्याआधी एका महिलेनं गर्भलिंगनिदान केलं होतं अशीही माहिती समोर आलीय.

मावसभावाने दिलं प्रशिक्षण?

दरम्यान, इंजिनिअरिंग करणाऱ्या तरुणीला गर्भलिंगनिदान करायचं प्रशिक्षण कुठे मिळालं असा प्रश्न उपस्थित होतोय. तरुणीचा मावसभाऊ डॉक्टर असून त्याला याआधी गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी अटक झाली आहे. जानेवारी पासून तो तुरुंगात आहे. जिथे आरोग्य विभागाने कारवाई केली तिथेच तो याआधी राहत होता. तसंच तरुणी तुरुंगात जाऊन भेटूनही आली आहे. दोघांमध्ये पत्रव्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. डॉ़क्टर पारस मंडलेचा यांनी म्हटलं की, तरुणीला डॉक्टर सतीश बाळू सोनवणे यानेच चाचणी करण्याचं प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे.

राज्यातील २२ जिल्ह्यांत लिंग गुणोत्तरचे प्रमाण घटले

गेल्याच आठवड्यात राज्यातील 22 जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान आणि गर्भपात जोरात सुरु असल्याचं समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार