जामनेर :- बँक व्यवस्थापकाची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून तसेच डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील बँकेची साठ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी (ता.१६) दुपारी एकच्या सुमारास हिंगणे (ता.जामनेर) गावाजवळ घडली. दरम्यान, पोलिसांनी शिताफीने तासाभरात गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४८ हजाराच्या रकमेसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. आयएफडीसी बँकेचे व्यवस्थापक सागर हिरासिंग चव्हाण हे हिंगणे बुद्रुक येथून कर्जाच्या हप्त्याचे साठ हजार रुपये गुरुवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास बॅगमध्ये घेऊन जात होते.
दरम्यान, दुचाकीवरील दोन भामट्यांनी व्यवस्थापक चव्हाण यांचा पाठलाग करून त्यांची दुचाकी अडविली व चाकूचा धाक दाखविला. तसेच डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्याकडून ६० हजार रुपये पळवून नेले होते. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिस पथकाने संशयिताचा पाठलाग करून हिंगणे, गाडेगाव येथील जंगलात मोठ्या शिताफीने एका तासात संशयितांना पकडून गजाआड केले. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ४८ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
व्यवस्थापक हिरासिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांचे वर्णन व तांत्रिक तपासाच्या आधारे जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी संशयितांचा छडा लावला. गंभीर स्वरूपाचा जबरी चोरीचा गुन्हा एका तासात उघड करून आरोपींना मुद्देमालासह अटक केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर- पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येकळे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे, पोलिस कर्मचारी अतुल पवार, गणेश भावसार, सागर पाटील, जितेंद्र ठाकरे यांच्या पथकाने केली.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.