राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची घणाघाती टीका

Spread the love

.

पुणे – पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे ऋतूंप्रमाणे बदलणारे नेते आहेत. त्यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. आता त्यांना शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे. त्यांना मूळ धागाच मिळत नाही. मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो, म्हणून ही धडपड आहे, अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीनंतर पाटील बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता पाटील म्हणाले, भेट घेतली पाहिजे, त्यांच्या नावात ठाकरे आहे. पण, काही तरी आरोप करायचे म्हणून करतात.

उद्धव ठाकरे हे आमचे इंजिन

महाविकास आघाडीत तिघांचे नेतृत्व आहे. आम्ही तर डब्बा आहे, उद्धव ठाकरे आमचे इंजिन आहेत. आम्ही इंजिनच्या मागे चालणारे कार्यकर्ते आहोत. जे निर्णय ते घेतात त्याची अंमलबजावणी आम्ही करीत असतो, असेही पाटील यांनी सांगितले.

आता पिक्चर टू सुरू आहे

मनसेच्या हनुमान चालिसावरही त्यांनी टीका केली. हनुमान चालिसा लावायला कोणाची मनाई आहे? भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप बाळासाहेब ठाकरे होते. त्या काळात कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? तेव्हा आमचा एकच बाप बोलायचा. पहिला पिक्चर काढला आता हा पिक्चर टू आहे. बोलणं सोप्पं आहे. करणं कठीण आहे. मला बोलायला लावू नका, त्यांना जितकी मी ओळखतो तितकं तुम्ही ओळखत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या समोर हनुमान चालिसा लावू, असा टोलाही त्यांनी लगावला.

नगरसेवक राखता येत नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भेट घेतली पाहिजे, त्यांच्या नावात ठाकरे आहे. काही तरी आरोप करायचे म्हणून करतात. ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्या बद्दल काय बोलायचं? असा टोला त्यांनी लगावला.

टीम झुंजार