कासगंज :- उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात एका ४० वर्षीय महिला वकिलाचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका वकिलासह त्याचे तीन मुलगे आणि दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.महिला वकील मोहिनी तोमर हिचं अपहरण झाल्यानंतर एका दिवसानंतर तिचा मृतदेह कालव्यात सापडला होता. या घटनेनंतर राज्यातील वकिलांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचा दबाव पोलिसांवर होता.
दरम्यान, या हत्ये प्रकरणी पकडण्यात आलेला आरोपी मुस्तफा कामिल याच्या मुलाच्या जामिनास विरोध केल्याने आपल्या पत्नीला धमक्या देण्यात येत होत्या, असा आरोप या महिला वकिलाच्या पतीने केला आहे. मोहिनी हिचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा पती बिजेंद्र तोमर यांनी वकील मुस्तफा कामिल (६०) त्यांचा पुत्र असद मुस्तफा, हैदर मुस्तफा, सलमान मुस्तफा आणि दोन सहकारी मुनाजिर रफी आणि केशव मिश्रा यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली होती. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुस्तफा कामिल आणि त्यांच्या तीन मुलांना रविवारी अटक करण्यात आली आहे. तर रफी आणि मिश्रा यांना सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींनी माझ्या पत्नीला कासगंज येथील कोर्टरूमच्या बाहेर बोलावले. तसेच तिथून अपहरण केले. त्यानंतर ते तिला अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आणि तिची हत्या केली, असा आरोप मृत महिला वकिलाच्या पतीने केला.
त्यांनी आरोप केला की, एका जुन्या प्रकरणामद्ये मुस्तफा कामिल यांच्या मुलांच्या जामीन अर्जाला विरोध केल्यानंतर माझी पत्नी खूप तणावाखाली होती. आरोपींकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याची माहिती माझ्या पत्नीने मला दिली होती, असेही या महिला वकिलाच्या पतीने सांगितले. दरम्यान, कासगंजच्या एसपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये नावं असलेल्या सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ