हापूर (उत्तर प्रदेश) :- येथील एक हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन घटनेची माहिती दिली. आरोपी पतीने पोलिसांना फोन करुन सांगितलं की, ‘हॅलो सर मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा’.यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून मृतदेह ताब्यात घेतलं आहे. मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, हापूरमधील मोहल्ला रफिक नगरमध्ये राहणाऱ्या रशीद अलीचे सुमारे 11 वर्षांपूर्वी नाजमीनसोबत लग्न झाले होते. रशीद आणि नजमीन यांना तीन मुलं आगेत. यामधील मोठ्या मुलाचं वय 9 वर्षं आहे. रशीद अलीचे त्याच्या पत्नीसोबत दररोज घरगुती वाद होत असत. पत्नीने आई-वडिलांच्या घरी जाण्याचा हट्ट धरत असे आणि रशीद तिला जाण्यापासून रोखत असे.
गळा दाबून करण्यात आली हत्या
गुरुवारी रात्रीही दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. याच रागात रशीदने पत्नीची हत्या केली. शुक्रवारी पहाटे 4 वाजता रशीदने नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर पोलिसांना फोन करून पत्नी नाझमीनचा गळा आवळून खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी येऊन मला अटक करावी असं त्याने फोनवर सांगितलं. घटनेची माहिती मिळताच हापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळावरून रशीदला अटक केली आणि मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
शवविच्छेदनासाठी पाठवला मृतदेह
शहर पोलीस अधिकारी जितेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, रफिक नगरमध्ये एका महिलेचा पतीने खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिलेचा मृतदेह घरात पडून होता तर आरोपी पतीही घरात होता. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सीओ म्हणाले की, आरोपी अमली पदार्थांचे सेवन करत असे, त्यामुळे घरात पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे