मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ मध्ये हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात विकेट्सने मात करून विजयी सलामी दिली. प्लेयर ऑफ द मॅच जेमिमा रॉड्रिग्जच्या (३८ चेंडूंत नाबाद ५३) शानदार अर्धशतकाच्या जोरावर विजयासाठीचे १५० धावांचे लक्ष्य भारताने १९ षट्कांत ३ बाद १५१ धावा करीत साध्य केले.विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवरप्लेच्या शेवटच्या सहाव्या षटकात सादिया इक्बालने यास्तिका भाटियाला (२० चेंडूत १७) फातिमा सनामार्फत झेलबाद केले.
त्यानंतर दहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर नशरा संधूने शेफाली वर्माला (२५ चेंडूत ३३) झेलबाद केले. अमीनने सीमारेषेवर शानदार झेल टिपला. शेफालीने आपल्या खेळीत चार चौकार लगावले. चौदाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नशरा संधूने कर्णधार हरमनप्रीत कौरला (१२ चेंडूत १६) बिस्माह मारूफकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (३८ चेंडूत नाबाद ५३) आणि रिचा घोष (२० चेंडूंत नाबाद ३१) यांनी भारताचा विजय साकार केला.त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर फिरकीपटू दीप्ती शर्माने अनुभवी जावेरिया खानला (६ चेंडूंत ८) बाद केले.

शॉर्ट फाईन लेगवर हरमनप्रीत कौरने तिचा झेल टिपला. त्यानंतर राधा यादवने मुनीबा अलीला (१४ चेंडूंत १२) बाद केले. तिने कर्णधार बिस्माह मारूफसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत ३२ धावांची भागीदारी केली.निदा दार आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाली. पूजा वस्त्रकारने तिला रिचा घोषमार्फत झेलबाद केले. तेराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर राधा यादवने सिद्रा अमीनला (१८ चेंडूंत ११) रिचा घोषमार्फत झेलबाद केले.

कर्णधार बिस्माह मारूफने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत नाबाद ६८ धावा करताना सात चौकार लगावले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची झंझावाती खेळी करताना दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने एकही विकेट न गमावता ५८ धावा केल्या आणि २० षटकांत चार विकेट्च्या मोबदल्यात १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.