पारोळा :- तालुक्यातील कोळपिंप्री येथे एका दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून तिच्या जीवनाला आधार दिला अन् विशेष म्हणजे संपूर्ण जबाबदारी घेत तीन मुलांसाठी ‘बाप’ही झाला. नवदांपत्य राहुल विनोद काटे (वय ३१) व अनिता काटे (वय २८) यांच्या पुरोगामी विचारांनी मराठा समाजात एक आदर्श घालून दिला आहे.
कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील विनोद आसाराम काटे यांच्या कुटुंबात क्रूर नियतीने गेल्या चार वर्षात तीन पिढ्यांतील चक्क चार सदस्य कुटुंबापासून हिरावून नेले आहेत. गेल्या वर्षी कुटुंबाचा आधारवड असलेला युवा शेतकरी संभाजी काटे याचे हृदयविकाराने निधन झाले. ज्यावेळी संभाजीचे निधन झाले त्याच्या पश्चात विद्या व वैभवी या जुळ्या मुली तर पत्नी अनिता या सात महिन्याच्या गर्भवती होत्या.जन्म होण्यापूर्वीच त्या गर्भातील ‘बाळाचा बाप’ या क्रूर काळाने आपल्यातून हिरावून नेला होता. अशा वेळी लहान दीर राहुलने धीर दिला. त्यानंतर आठ महिन्यांपूर्वी अनिता यांनी ‘मयंक’ या गोंडस बाळाला जन्म दिला.
भावाच्या निधनानंतर घरावर दुखाचा डोंगर कोसळला होता. अशात विधवा वहिनी, जुळ्या मुलीसह आठ महिन्याचा पुतण्या ‘मयंक’ डोळ्यासमोर होते. त्यांचं दुख पहावत नसलेल्या दिराने विधवा वहिनीला पुन्हा जगण्याचा आधार देण्यासाठी तयार झाला.
प्रतिकूल परिस्थितीत आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरात सुनकन्या म्हणून वावरावी आणि नेहमी तिच्या कपाळावरचं कुंकू हसत खेळत असावं, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला अन् मोठ्या मनाच्या तरुणाने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.
आपली स्वतःची भावी स्वप्ने बाजूला सारत राहुल काटे याने आपली विधवा वहिनी अनिता हिच्याशी आज कोळपिंप्री येथील भवानी मंदिर परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विवाह केला. लग्नाच्या रेशिमगाठी बांधत विधवा वहिनी आणि दीर विवाह बंधनात अडकले. त्यांच्या या विवाहाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
हे पण वाचा
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.