दोघांचे एकमेकांवर प्रेम,लग्नास आली जात आडवी, त्याच्या कुटुंबाने केला विरोध तरुणीने केली आत्महत्या, प्रियकरासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल.

Spread the love

कोल्हापूर : वेगळ्या जातीतील असल्यामुळे प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी घरी बोलवून दमदाटी केल्यामुळे कोथळी (ता. करवीर) येथील सानिका संभाजी कुंभार (वय २०) हिने २९ एप्रिल रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी तिचा प्रियकर रोहित उर्फ अक्षय रंगराव मुसळे, त्याचे वडील रंगराव गोविंदा मुसळे आणि आई सुलाबाई रंगराव मुसळे (तिघे रा. कोथळी) यांच्या करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत मृत तरुणीची आई लता संभाजी कुंभार (वय ४८, रा. कोथळी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिका आणि रोहित यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या लग्नाला रोहितच्या घरातून विरोध होता. त्याच्या आई-वडिलांनी सानिका हिला घरी बोलवून प्रेमसंबंध आणि लग्नास विरोध केला. ‘तू आमच्या जातीत बसत नाहीस. सून म्हणून तू आम्हाला पसंत नाहीस. रोहितशी लग्न केलेस तर तुला घरात घेणार नाही. त्यापेक्षा तू दुसरीकडे लग्न कर.’ असे सांगून तिला धमकावले.

या नैराश्यातून तिने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रोहितसह त्याच्या आई, वडिलांच्या विरोधात लता कुंभार यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार