.

पिंपरी – कुरिअरद्वारे मागवलेल्या 97 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड येथील दिघीतील डीटीडीसी कुरिअर कंपनीत ही कारवाई करण्यात आली. हा शस्त्रसाठा अहमदनगर आणि औरंगाबाद जाणार होता. दिघी पोलिसांनी ही कारवाई केली.
उमेश सूद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद), आकाश पाटील (रा.चितली, अहमदनगर) मनिंदर (रा. घंटाघर कॉम्प्लेक्स, अमृतसर, पंजाब) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सूद आणि मनिंदर यांनी आरोपी अनिल होन व आकाश पाटील यांना कुरियरद्वारे घातक शस्त्र पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी डीटीडीसी कंपनीत छापा मारून एकूण 97 तलवारी 2 कुकरी आणि 9 म्यान जप्त केले आहेत.

दिघी येथे डीटीडीसी कुरिअर कंपनीचे वितरण केंद्र आहे. येथून हा शस्त्रसाठा औरंगाबाद आणि अहमदनगर येथे जाणार होता. एवढा मोठा शस्त्रसाठा नेमका कशासाठी मागवला होता, याबाबत दिघी पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.