.

नांदेड – नांदेड शहरात दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या गोळीबारत बियाणी गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेने नांदेड शहर हादरून गेले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दिवसा ढवळ्या होणाऱ्या अशा घटनांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे.
संजय बियाणी हे कामानिमित्त घराबाहेर पडत होते. दरम्यान अचानक दुचाकीवर दोन अद्यात व्यक्ती आले व त्यांनी बियाणी यांच्या दिशेने 4 गोळ्या झाडल्या. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियानी यांच्या निवास्थानजवळ शारदा नगर येथे घडला. या गोळीबार बियाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोळीबाराची ही घटना कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे व हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला याचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, मागील वर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला होता. त्यात आता ही घटना घडली.