.

लखनौ – आजारी पत्नीला हातगाडीवर बसवून रुग्णालयात नेत असलेल्या वृद्धाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बलियाच्या चिल्कहार ब्लॉकमध्ये राहणारे शुकुल प्रजापती आपल्या आजारी पत्नीला हातगाडीवरून रुग्णालयात घेऊन गेले. सुमारे चार किलोमीटर धावून शुक्ला जेव्हा प्रजापती सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचले तेव्हा त्यांच्या पत्नीला बलिया येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर शुक्ला यांनी कसे तरी टेंपोमधून पत्नीला बलिया येथील जिल्हा रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शुक्ला यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना 28 मार्चची आहे.
शुक्ल प्रजापती हे अत्यंत गरीब आहेत, त्यांच्याकडे पक्के घरही नाही, पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्यासाठी पुरेसे पैसेही नाहीत. शुक्ला सांगतात की, त्यांना अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोग्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी नीरज पांडे यांनी मंगळवारी सांगितले की, उपमुख्यमंत्री पाठक यांनी महासंचालक (वैद्यकीय आणि आरोग्य) यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी अंदौर गावातील रहिवासी शुक्ला यांचे म्हणणे समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, 28 मार्च रोजी पत्नीला दवाखान्यात नेण्याचे कोणतेही साधन न मिळाल्याने ते तिला हातगाडीवर घेऊन चिलकहार आरोग्य केंद्रात गेले. डॉक्टरांनी काही औषधे दिल्यानंतर पत्नीला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर ते पत्नीला पिरिया गावात हातगाडीवर सोडून कपडे आणि पैसे घेण्यासाठी घरी गेले. त्यानंतर पत्नीला टेम्पोतून रुग्णालयात नेले. मात्र त्यांच्या पत्नीचा जीव वाचू शकला नाही.
रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्ला यांनी दावा केला की रात्री 11 च्या सुमारास त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर त्यांनी 1100 रुपयांत खासगी रुग्णवाहिका करून मृतदेह घरी आणला.