
इंदौर – कौटुंबिक कारणामुळे एका महिलेने झोपडी पेटवून दिल्यामुळे दोन लहान मुलींचा जळून मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडली आहे. ज्या महिलेने झोपडीला आग लावून दिली, तिचे नाव बरखा मेडी असे आहे. ती या मुलींची आत्या आहे. एका व्यक्तीबरोबरच्या प्रेमप्रकरणाच्या मुद्यावरून घरामध्ये वाद झाल्यावर तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले.
झोपडीच्या आगीमध्ये मरण पावलेल्या मुली नंदू आणि मुस्कान या अनुक्रमे 4 आणि 6 वर्षे वयाच्या होत्या. ही घटना घडली तेंव्हा दोन्ही मुली झोपल्या होत्या. राजेंद्र नगर भागात सोमवारी रात्री ही घटना घडली. इंदौर पोलीस आयुक्त हरीनारायणचारी मिश्रा यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. आग विझवेपर्यंत दोन्ही मुलींचा जळून मृत्यू झाला होता, असेही पोलिसांनी सांगितले.
बरखा मेडा हिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या मुद्यावरून तिचे आणि तिच्या दुसऱ्या पतीचे वाद होत असत. या वादादरम्यान बरखाच्या वडिलांनी तिला मारले होते. त्याचा राग मनामध्ये धरून तिने आपल्याच वडीलांच्या झोपडीला आग लावून दिली होती.