. पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ :

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं दिसत आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा रुग्णालायत उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) झाला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. नांदेड शहरात भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्यावर कोणी हल्ला केला, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संजय बियाणींच्या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर घरासमोरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांची प्राणज्योत मालवली.
संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात तणाव निर्माण झाला आहे
कुख्यात गुंडाची खंडणीसाठी धमकी
संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वीच 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती, त्यात संजय बियाणी यांचा समावेश होता.
नांदेडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा
नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढल्याचं गेल्या काही काळात पाहायला मिळत आहे. गोळीबाराच्या घटना वरचे वर घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात भीती व्यक्त केली जात आहे.
पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ :