कणकवली :- तालुक्यातील कोळोशी-वरचीवाडी येथे चार दिवसांसाठी घरी राहण्यास आलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचा खून झाल्याचा प्रकार काल सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला. विनोद मधुकर आचरेकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी गेल्याच महिन्यात पोलिस खात्यामधून निवृत्ती घेतली होती. या खूनप्रकरणी पोलिसांनी त्यांचा नातेवाईक सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (२४) याला ताब्यात घेतले आहे.रात्री झोपताना जबरदस्ती केल्याने आचरेकर यांच्या डोक्यात कुदळ मारली, अशी कबुली सिद्धिविनायक याने दिल्याचे कणकवली पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कोळोशी-वरचीवाडी येथे आचरेकर यांचे घर आहे. त्यांची आई, पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा असा परिवार असून, ते सर्वजण मुंबईला असतात. त्यांनी २८ ऑक्टोबरला पोलिस खात्यामधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.ते सहायक पोलिस निरीक्षक होते. ते दोन दिवसांपूर्वी कोळोशी येथील घराची साफसफाई करण्यासाठी आले होते, तर काल (ता.२८) मुंबईला जाणार होते. संशयित सिद्धिविनायक पेडणेकर याने स्थानिकांना आणि पोलिसांना दिलेल्या महितीनुसार बुधवारी (ता.२७) रात्री नऊच्या सुमारास सिद्धिविनायक त्याच्या घरातून जेवणाचा डबा घेऊन कोळोशी-वरचीवाडी येथील आचरेकर यांच्या घरी आला. सिद्धिविनायक हा आचरेकर यांचा मामेभावाचा मुलगा आहे. सिद्धिविनायक आणि आचरेकर यांनी रात्री साडेनऊनंतर काही वेळ मद्यप्राशन केले. त्यानंतर जेवण आटोपून ते रात्री अकराच्या सुमारास बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले. तेव्हा काही वेळाने आचरेकर यांनी आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे हॉलमध्ये ठेवलेली कुदळ आणली आणि ती आचरेकर यांच्या डोक्यात मारली. यात आचरेकर बेडवर कोसळले. ते झोपले असे समजून सिद्धिविनायकही बेडरूमध्ये झोपी गेला. सकाळी सातच्या सुमारास सिद्धिविनायकला जाग आली. त्यावेळी आचरेकर यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त आले असून, ते मृत झाल्याची बाब सिद्धिविनायकच्या लक्षात आली. त्याने तातडीने वडील संजय पेडणेकर यांना दूरध्वनी करून आचरेकर यांचा कुणीतरी खून केल्याची माहिती दिली. त्याचबरोबर १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.१०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकाही बोलावून घेतली. १०० क्रमांकावर फोन केल्यानंतर कणकवली पोलिसांनी तेथील पोलिसपाटील संजय गोरुले यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. सिद्धिविनायकचे वडील संजय यांनाही फोन करून घटनेची खातरजमा केली. पोलिसपाटील गोरुले सकाळी साडेसातच्या सुमारास आचरेकर यांच्या घरी दाखल झाले. त्यावेळी सिद्धिविनायक आचरेकर यांच्या मृतदेहावर पडून रडत होता. आचरेकर विवस्त्र होते, तर त्यांच्या डोक्याला मोठा मार बसल्याने बेडरूमध्ये रक्ताचा सडा पडला होता. सिद्धिविनायकच्याही पायाला रक्त लागल्याचे दिसून आले होते. ही घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, देवगडचे निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहायक उपनिरीक्षक राजन जाधव, कणकवलीचे उपनिरीक्षक महेश शेडगे, अनिल हाडळ, स्थनिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजेंद्र पाटील, हेमंत खोपडे, पोलिस नाटेकर, महाडिक, पाटील, भिवसन पाटील, तांबे, अमोल आगाव, माने, श्रीमती कांबळे, झोरे, स्वप्नील जाधव, सरपंच गुरू आचरेकर, ग्रामसेवक मंगेश राणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही ।। घटनास्थळी भेट दिली. सिंधुदुर्गचे ठसे तज्ज्ञ विभागाच अधिकारी आणि कर्मचारी, तसेच श्वान पथकाने संपूर्ण घराची तपासणी केली. आचरेकर यांच्या घरातच असलेला संशयित सिद्धिविनायक याला प्राथमिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याने आपणच आचरेकर यांच्या डोक्यात कुदळ मारली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. स्त्रीची भूमिका करणारा सिद्धिविनायकने खाद्यपदार्थ विषयात डिप्लोमा केला आहे. शाळा, महाविद्यालयापासून तो दशावतारी नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत आहे. तसेच महिलांच्या वेशभूषेतील ‘रिल्स’देखील तो सातत्याने करत असल्याने घरातील मंडळींशी त्याचे सतत वाद होत असल्याची माहिती स्थानिकांतून देण्यात आली. दरम्यान, सिद्धिविनायकला आज (ता.२९) न्यायालयात हजर केले जाणार आहे. मृत आचरेकर यांचे नातेवाईकही आज कोळोशी येथे दाखल होणार असल्याची माहिती कणकवली पोलिसांकडून देण्यात आली.
संशयिताला पश्चात्ताप नाही
पोलिसांनी संशयित सिद्धिविनायक याला ताब्यात घेतले. दिवसभर त्याची चौकशी केली. यावेळी त्याने रात्रीपासूनचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आचरेकर यांच्या खूनप्रकरणी त्याला कोणताही पश्चात्ताप झाला नसल्याचे दिसून आले. सिद्धिविनायक याच्या वडिलांनी आपला मुलगा मनोरुग्ण असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.