पैठण :- आई सोबत शेतात गेलेल्या दोन सख्या भावंडांचा विहीरित पडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आडुळ बु., रजापुर,ता. पैठण शिवारात घडली.प्रणव कृष्णा फणसे व जय कृष्णा फणसे असे मृतक चिकमुकल्यांची नावे आहेत. आडूळ बु., ता. पैठण येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापुर शिवारात गट क्रमांक २८ मध्ये दोन एकर शेती असून मंगळवारी रोजी कृष्णा फणसे यांची पत्नी वर्षा फणसे व त्यांची दोन मुले प्रणव व जय असे तिघे जण सकाळी १० वाजेच्या सुमारास गेले होते.वर्षा फणसे ही शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे एकटी जमा करीत होती. तर त्यांची दोन्ही मुले बाजुला खेळत असताना वर्षा हिची नजर चुकुन कठडे नसलेल्या विहीरिकडे ते दोघे जण गेले व तेथे खेळत असतांना त्यांचा तोल जाऊन लहान मुलगा प्रणव कृष्णा फणसे (वय-७ वर्षे) व मोठा मुलगा जय कृष्णा फणसे (वय-९ वर्षे) या दोघा सख्या भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.
विहीरित पडलेल्या आवाजामुळे वर्षा हि विहीरिकडे पळत सुटली. तिने आरडा ओरड केल्याने आजूबाजूच्या शेतातील शेतकरयांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन पाचोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. यानंतर ताबडतोब सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बिट जमादार अफसर बागवान व रणजीत दुल्हत यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रणव याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला.
माञ, मोठा मुलगा जय याचा मृतदेह लवकर सापडत नसल्याने शेवटी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना पचारण करावे लागले. यानंतर विनायक कदम इंचार्ज, फायरमन रितेश कसुरे, छगन सलामबाद, कमलेश सलामबाद, विशाल गरडे, रावसाहेब जाधव, रावसाहेब वाकळे, रामदास राऊत यांनी परिश्रम घेऊन विहिरीतील गाळात खाली जाम पाण्यात फसलेले जयचे प्रेत बाहेर काढले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली आहे. हि दोन्ही मुल देखनी व शिक्षणात खुप हुशार होती. वर्षा व कृष्णा यांना हि दोनच मुलं होती त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आई वडीलांसह अनेकांना आश्रु अनावर झाली होती.