छत्रपती संभाजीनगर:- सासुरवाडीतील नातेवाईकांनी आमच्या मुलीला का नांदवत नाही म्हणून जावयासह परिवारातील सदस्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.कार्तिक नारायण लंबे असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील भोकरगाव शिवारात सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत मयताचे भाऊ गणेश लंबे यांनी शिऊर पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी मयताची पत्नी रुचा, वडील साईनाथ सोनवणे, आई (नाव माहीत नाही) भाऊ पवन सोनवणे (सर्व रा.भादली.) मामा बंडू पवार, विजय पवार (रा. चापानेर. ता. कन्नड), तसेच बाबासाहेब त्रीबंक सोनवणे (रा. खरज वैजापूर) यांच्या विरोधात जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, माझा भाऊ कार्तीक गणेश लंबे याचा विवाह वैजापूर तालुक्यातील भादली येथील रुची साईनाथ सोनवणे हिच्या सोबत दि.३ एप्रिल २०२४ मध्ये झाला होता. मात्र विवाहिता मतीमंद असल्याने तिला माहेरी पाठवण्यात आले. दि. २५ रोजी सकाळी सकाळी नऊ वाजता माहेरकडील रुचाचे वडील, आई, मामा यांनी भोकरगाव येथे येऊन तुम्ही आमच्या मुलीला का नांदवत नाही असे म्हणुन आमच्या परिवारातील सदस्यांना शिविगाळ केली.
हा वाद पोलीस ठाण्यात आल्यानंतर गावातील प्रतिष्ठीत मंडळीनी शिऊर पोलीस ठाण्यात येऊन दोन्ही परीवाराची समजुत काढली. तसेच रूची हिला मानसिक रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचे आश्वासन सासरकडील मंडळीनी दिल्यानंतर हा वाद मिटला. मात्र माहेराकडील नातेवाईकांनी दि.२८ डिसेंबर रोजी मयत कार्तीक यांच्या काकांच्या मोबाईलवर कॉल करुन तुम्ही मुलीला घेऊन जा बाकी काही सांगु नका असे बोलत असताना माझा भाऊ घाबरुन गेला. त्यामुळे टेंशनमध्ये येऊन त्याने गट न.१२९ मध्ये जाऊन झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले’, असे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणात माहेरकडील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.