रोहतक :- हरियाणाच्या रोहतकमध्ये एका सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा हा मृतदेह असल्याचं उघड झालं आहे. सुटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. हिमानी या भारत जोडो यात्रेत हरयाणवी पेहरावात सहभागी जाल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोटोही काढला होता. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोहतकमध्ये दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यासाठी प्रचारही केला होता. मात्र, त्यांची हत्या झाल्याचं ऐकून हरियाणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार बीबी बत्रा यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या बाबत माहिती अशी की महामार्गालगतच्या झुडपात एका सुटकेसमध्ये एक मृतदेह आढळला आहे,” असे रोहतक जिल्ह्यातील संपना पोलिस स्टेशनचे एसएचओ बिजेंद्र सिंग म्हणाले. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले. जेव्हा सुटकेस उघडली तेव्हा त्यात एका २०-२२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. तिने हातात बांगडी आणि गळ्यात स्कार्फ बांधला होता. या मुलीची ओळख हिमानी नरवाल अशी झाली आहे, ती रोहतकमधील विजय नगरची रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, काही रस्त्याने जाणाऱ्यांनी सुटकेस पाहिली आणि त्यांनी पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात सांगितले की, मुलीकडे पाहून असे वाटत होते की तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता आणि नंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून देण्यात आला होता.
त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यावेळी या तरुणीची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच मृतदेहाची ओळख पटावी म्हणून रोहतक पीजीआयमध्ये तिचा मृतदेह ठेवला.
आमचीच कार्यकर्ती
मात्र, आता काँग्रेसचे आमदार भारत भूषण बत्रा यांनी ही युवती काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ती असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह तिने काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या प्रचारसभेत भाग घेतला होता, अशी माहिती बत्रा यांनी दिली. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तरुणी लग्न सोहळ्यात
यावेळी बत्रा यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आहे. त्यामुळे आता सरकारने आरोपींच्या मनात दहशत निर्माण केली पाहिजे. आरोपींनी गुन्हे करू नये म्हणून सरकारने वचक दाखवला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर, हिमानीने एक दिवस आधी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील असून ती या लग्न सोहळ्यात दिसत आहे.आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सांपला येथून जाणाऱ्या एका फ्लायओव्हर जवळ एक सुटकेस सापडली. त्यात मृतदेह होता. त्यातच हा मृतदेह काँग्रेसच्या महिला नेत्याचा असल्याने पत्रकारांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. मात्र पोलीस उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी होताना दिसत आहे.
आईचा टाहो
“माझी मुलगी गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसशी संबंधित होती. माझ्या मुलीला स्वच्छ राजकारण करायचं होतं. तिचे काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी अनेक वेळा वाद झाले. तिला तडजोड करण्यासही सांगण्यात आली. पण माझी मुलगी म्हणायची की मी जे योग्य आहे तेच करेन. यामुळे अनेक लोक तिच्या विरोधात होते.”
हिमानीच्या आईला विचारण्यात आलं की, त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलल्या आहेत का? यावर त्यांनी सांगितलं की, “मी हुड्डा साहेबांशी बोललो आहे. मी त्यांना ओळखते. मला फक्त एवढंच म्हणायचे आहे की माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मला न्याय हवा आहे. मारेकऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा व्हायला हवी. माझ्या मुलीच्या हत्येत कोणीही सहभागी असू शकतं कारण तिचे सर्कल खूप मोठं होतं.”