इचलकरंजी :- ‘सोडचिठ्ठी न देता पत्नीने दुसरा विवाह केला, न्याय कुणाकडे मागायचा’ असा आरोप करीत दिवसभर ताटकळत बसल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यातच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. शेखर अर्जुन गायकवाड (वय ३१, रा. करकंब, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. पेट घेतलेल्या अवस्थेत तो पोलिस ठाण्यात सैरवैर धावत सुटला. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात पोलिस कर्मचारी नीलेश कोळी यांच्या हाताला भाजले.पोलिसांनी आग शांत करीत त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. गायकवाड ६० टक्के भाजून जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गायकवाडचा विवाह काही महिन्यांपूर्वी झाला.
त्याची पत्नी सध्या माहेरी इचलकरंजीत राहत आहे. घटस्फोटाचे कागदपत्र न मिळवताच तिचा दुसरा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गायकवाड संतप्त झाला. काल दुपारच्या सुमारास तो थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेला व आपली कैफियत मांडली. सासरच्या मंडळींना बोलावून घेण्यासह पोलिसांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.त्यामुळे पोलिस ठाणे आवारात गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिस ठाण्यात मोजकेच कर्मचारी होते. पेटलेल्या अवस्थेत तो सैरभैर धावत ठाणे अंमलदाराच्या टेबलापर्यंत गेला. पोलिस आणि नागरिकांनी त्याच्या अंगावर माती टाकून, काहींनी स्वतःच्या अंगातील शर्ट काढून, तर काहींनी घरातून चादर आणून आगीवर लपेटली. तरीही तो धावत पोलिस ठाण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.
उपचार घेण्यास नकार
आयजीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतरही गायकवाडने उपचार घेण्यास नकार दिला. पत्नी किंवा सासरवाडीतील कोणी आले नाही तर उपचार घेणार नसल्याचा जोरदार आक्रोश करत त्याने डॉक्टरांनाही अडचणीत टाकले.
पोलिसांना समजला होता इशारा
गायकवाड पोलिस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. त्यानंतर गायकवाडचा पोलिसांनी शोध सुरू केला. त्या दरम्यानच तो आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या स्थितीत धावत ठाण्यात आला.
यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न
गायकवाड याच्याशी सतत वाद होत असल्याने त्याची पत्नी माहेरी इचलकरंजीत आली होती. काही दिवसांपूर्वी गायकवाड याने इचलकरंजीत येऊन पत्नी नांदायला येत नसल्याच्या संतापातून विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आजचा प्रकार झाला.
गायकवाड रेकॉर्डवरील गुन्हेगार
आत्मदहनाचा प्रयत्न करणारा शेखर गायकवाड पूर्वीपासूनच अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘त्याच्याविरोधात अकलूज पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहेत. त्याने स्वतःचा ट्रान्स्पोर्ट व्यवसाय असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे; मात्र तो फक्त चालक आहे. त्याने देवळात दुसरे लग्नही केले आहे. दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करणे, लोकांचे पैसे बुडवणे असे त्याचे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत.’