पुण्यात प्रेमाचे नाटक, लग्नाचे वचन अन्‌ प्रियकराला लाखोंचा चुना

Spread the love

पुणे- प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराकडून 19 लाख रोख, 24 लाखांचे दागिने, तीन फ्लॅट व एका दुकानाच्या चाव्या, घेणाऱ्या 29 वर्षीय महिलेस विमानतळ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हा प्रकार 9 सप्टेंबर 2021 ते 30 मार्च 2022 दरम्यान घडला. याबाबत 38 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात तिच्या अन्य दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा रिएल इस्टेट व्यवसाय आहे. आरोपी महिलेने सलूनच्या कामासाठी फिर्यादीकडून 4 लाख रुपये घेतले. त्यानंतर तक्रार करण्याची धमकी देऊन 5 लाख रुपये आरटीजीएसद्वारे घेतले. यादरम्यान तिने प्रेमाचे नाटक करत 4 जानेवारी रोजी 9 लाख व त्यानंतर 13 जानेवारी रोजी 44 हजार 588 रुपयांचे दागिने ब्लॅकमेल करून घेतले. त्यानंतर, लग्न करण्याचे कारण सांगत डोंबिवली येथून 22 लाख 60 हजारांचे दागिने घेतले. याखेरीज फिर्यादीचे 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे कडे घेऊन एका दुकानाचा भाडेपट्टा, तीन सदनिकांच्या चाव्या घेऊन गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी, तिला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्या ताब्यातून रोख रोकड तसेच सोने जप्त करायचे आहे. गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करायची असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

टीम झुंजार