एरंडोल तालुक्यात किरकोळ कारणावरून युवकांनी केलेल्या मारहाणीत चार ग्रामस्थ जखमी; एक गंभीर, तेरा संशयित ताब्यात.

Spread the love

एरंडोल :- सत्संग सुरु असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला होऊन महिलांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या असे सांगितल्याचा राग आल्यामुळे पंधरा ते वीस युवकांनी अचानक ग्रामस्थांवर हल्ला करून मारहाण केल्यामुळे चार जण जखमी झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री बुद्रुक (ता.एरंडोल) येथे घडली. जखमीपैकी एका ग्रामास्थाची प्रकृती गंभीर असून त्यांचेवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत
पोलिसांनी तेरा संशयितांना अटक केली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.सर्व संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.तीन संशयित फरार झाले आहेत.गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.चाळीसगाव
विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोटे यांनी पिंप्री खुर्द येथे भेट देवून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

याबाबत माहिती अशी,की पिंप्री खुर्द येथील कबीर मंदिरात सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरासमोर रस्त्यावरच गावातील शरद भिल याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच ते सहा युवक थांबले होते.त्यावेळी धनंजय पाटील,रुपेश पाटील, जयवंत पाटील हे सत्संगाच्या कार्यक्रमासाठी जात असल्याने त्यांनी
शरद भिल व त्याच्या सहका-यांना ग्रामस्थांना सत्संगासाठी जातांना अडचण येत असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभे राहून वाढदिवस साजरा करा असे सांगितले.मात्र शरद भिल व त्याच्या सहका-यांना धनंजय पाटील यांचा बोलण्याचा राग आल्याने त्यांनी त्यांचेशी वाद घालून शिवीगाळ केली व तुम्हाला सोडणार नाही पाहून घेऊ अशी धमकी देवून निघून गेले.

रात्री दहा वाजेच्या सुमारास पंधरा ते सोळा युवक काठ्या व दांडके घेवून गावात आले आणि त्यांनी धनंजय पाटील यास मारहाण करण्यास सुरुवात केली.धनंजय यास युवकांकाडून मारहाण केली जात असल्याचे पाहून त्याचे वडील अनिल पाटील हे त्यास वाचवण्यासाठी आले असता शरद भिल याने अनिल पाटील यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केल्याने ते रस्त्यावरच कोसळले. अनिल पाटील यांची प्रकृती गंभीर असून त्यांचेवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शरद भिल व त्याच्या सहका-यांनी केलेल्या मारहाणीत अरविंद पाटील,संदीप पाटील जखमी झाले.तसेच राहुल मोरे हा लोखंडी खांबावर पडल्याने जखमी झाला.ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता

मारहाण करणारे युवक गावाबाहेर पळाले.ग्रामस्थांनी पाठलाग करून आकाश मोरे,भोला अहिरे,योगेश बागुल,राहुल मोरे यांना ताब्यात घेतले तर उर्वरित युवक फरार झाले.युवक गावात रस्त्यावर दिसणा-या ग्रामस्थांना मारहाण करत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचेसह कर्मचा-यांनी पिंप्री येथे जाऊन ग्रामस्थांना शांत केले.याबाबत धनंजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बारा संशयितांना ताब्यात घेतले असून तीन जण फरार झाले आहेत.दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी